Ad will apear here
Next
सायकलवरून ‘उत्कर्षा’कडे...


खेड्यापाड्यात वाहतुकीची साधनं नसल्याने दूरवर पायपीट करणारी मुलं आजही आपल्याला बातम्यांतून भेटतात. अनेकदा त्यावर चर्चाही होते; पण ती समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष मदत करणाऱ्यांची संख्या मात्र फार कमी असते. शहरात पडून असलेल्या सायकली दुरुस्त करून त्या अशा मुलांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम ‘उत्कर्ष – एक सामाजिक जाणीव’ या संवेदनशील तरुणांच्या ग्रुपने सुरू केलाय. लेणे समाजाचे’ सदरात आज पाहू या, अशा मुलांच्या उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या या ग्रुपविषयी...

...........
ग्रामीण महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यात आजही अशी असंख्य खेडी आहेत, की ज्यांच्यापर्यंत दळणवळणाची साधनं पोहोचलेली नाहीत. त्यामुळे विकासाच्या संधींच्या उपलब्धतेवर मर्यादा येते. शिकण्यासाठी १०-१५ किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने बरीच मुलं-मुली शाळा सोडून देतात. शोधायला गेलं, तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. तशा काही बातम्या वाचनात आल्या, तर त्यावर तात्पुरती चर्चा होते आणि नंतर विसरूनही जायला होतं; पण या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून, काही संवेदनशील तरुणांनी आपल्या पातळीवर तो सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.  ‘उत्कर्ष - एक सामाजिक जाणीव’ असं तरुणांच्या या ग्रुपचं नाव आहे. आता त्यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती घेऊ या.

शहरात बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सायकली पडून असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. वापरायला कुणी नाही म्हणून किंवा दुरुस्त करायला जास्त खर्च येत असल्याच्या कारणावरून त्या सायकली पडून असतात. अशा सायकली गोळा करून, दुरुस्त करून गरजू मुला-मुलींपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम हा ग्रुप चालवतो. त्यासाठीचा खर्चही हा ग्रुपच करतो. लोकांनी आपल्याकडची सायकल या ग्रुपच्या प्रतिनिधीच्या ताब्यात दिली, की ती योग्य नि गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचल्याचा पडताळाही सायकल देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

या अभिनव उपक्रमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसेच वैयक्तिक ओळखीतून, लोकसहभातून भरघोस प्रतिसाद मिळू लागला आहे. अनेक संवेदनशील नागरिकांनी या उपक्रमाला हातभार लावला. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबली आहे. त्यांना ही छोटीशी मदत एक उमेद देऊन जाते. आजवर ‘उत्कर्ष ग्रुप’ने सुमारे १५० सायकली जमा करून त्यांचे ठिकठिकाणी वाटप केले आहे.

रायगड जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शिघ्रे, डोंगरी, वाफेघर या जिल्हा परिषद शाळांमध्ये, तसेच बदलापूरजवळील कासगांव आणि पुणे जिल्ह्यातल्या केतकवळे येथील शाळांमध्ये मिळून एकूण ६६ सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. पुण्याजवळच्या भोसे (खेड तालुका) येथे हा ग्रुप २८ सायकली देणार आहे.

या उपक्रमाबरोबरच अन्य सामाजिक उपक्रमही या ग्रुपच्या माध्यमातून चालवले जातात. अनाथाश्रमातील मुलांची पावसाळी सहल, दिवाळीत नवीन कपड्यांचे वाटप, होळी व इतर सणांच्या निमित्ताने छोटे-मोठे उपक्रम राबविले जातात. आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मदत मिळवून दिली जाते.

पुण्याजवळच्या केतकवळे येथील वैशाली काटकर ही मुलगी नुकतीच दहावी पास झाली; पण पुढचं शिक्षण तिला पैशांअभावी करता येणार नव्हतं. ही माहिती उत्कर्ष ग्रुपला कळताच या ग्रुपने भोर येथील अनंतराव थोपटे कॉलेजमध्ये तिला प्रवेश घेऊन दिला. तिची वर्षभराची फी ग्रुपच्या माध्यमातून भरण्यात आली. त्यासाठी चैतन्य ताम्हणकर यांनी ग्रुपला मोलाचे सहकार्य केले. ग्रुपचे योगेश महाजन यांनी ही माहिती दिली.

प्रामाणिकपणा आणि सामाजिक काम करण्याची तळमळ असेल, तर अनेक लोक पाठीशी उभे राहतात, याचा अनुभव या ग्रुपला येतो आहे. या उपक्रमाला सोशल मीडिया आणि वैयक्तिक ओळखीतून खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्यांकडून या ग्रुपला सायकलींचे दान करण्यात आले. जुन्या सायकलींसोबतच दुबई, बहारिन, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया येथील काही जणांकडून नव्या कोऱ्या सायकलीही देण्यात आल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले या ग्रुपमधील सदस्यांचे परदेशातील काही मित्र या उपक्रमाला मदत करत आहेत.

या उपक्रमाचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा टप्पा २३ जुलै २०१७ रोजी पार पडला. नाशिक जिल्ह्यातील मालेगावपासून १५ किलोमीटर अंतरावर रोझे, रोजवाळ आणि शेदुर्ली अशी तीन खेडेगावं आहेत. या खेड्यांतील मुले काही किलोमीटर अंतर पायी तुडवत दहिवाळ येथील शाळेत जात होती. या मुलांची अडचण लक्षात घेऊन तेथे ७० सायकलींचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला अनेकांचे हात लागले आहेत. नाशिकमधील हरिकृष्ण कुलकर्णी, संदीप जैन, ज्ञानेश्वर कराड व अजाबराव खैरनार या सर्वांनी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. गेले कित्येक महिने नाशिकच्या कानाकोपऱ्यात फिरून ही मंडळी सायकली जमा करत होती. या मोठ्या कार्यक्रमानंतर उत्कर्ष ग्रुपचा आत्मविश्वास वाढला आहे. ७० सायकली वेगवेगळ्या ठिकाणाहून जमवणं, मुंबई ते नाशिक आणि तिथून पुढे मालेगाव असं अंतर कापून एकाच दिवशी सायकलींचं वाटप करणं आव्हानात्मक होतं; पण स्थानिक लोकांनी उत्कर्ष ग्रुपच्या मेहनतीला मोठ्या आनंदाने मदत करून साथ दिली.

अनेकदा प्रश्नांवर फक्त चर्चाच केली जाते. अनेकांना काही तरी करायची इच्छा असते; पण वाट सापडत नाही. एकट्या-दुकट्याने प्रश्न सुटत नाहीत, असं म्हणून आपणही त्याकडे दुर्लक्ष करत राहतो; पण अशी सगळी कारणं बाजूला सारून हे संवेदनशील तरुण एकत्र आले आणि त्यांनी हे कार्य सुरू केले आहे.

या उत्कर्ष ग्रुपमध्ये योगेश महाजन, प्रसाद जोशी, यदु पाटील, विलास पाटील, रवींद्र पाटील, अजित तांबे, मयूरेश कापोटे, सचिन कुलकर्णी, नितीन शेंडगे, आरिफ काझी, संभाजी धुंबरे, संदीप भास्कर, तुषार दानवे, नीलेश पावर, दीपक भोई, जयेश चौधरी, सागर पाटील, संग्राम देशमुख, योगेश चौरे, विक्रम घाटगे, भारत साबळे, नचिकेत गुरव यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींच्या स्वप्नांना प्रत्यक्ष कृतीतून बळ देणाऱ्या या ग्रुपचं कौतुक तर करायला हवंच; पण समाजानं त्यांना सहकार्यही करायला हवं.

संपर्क :
योगेश महाजन :
९०४९९ ५७५७३
प्रसाद जोशी :  ९८२३१ ९९९५३

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZXUBK
 अतिशय सुंदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मी पण या ग्रुप मधे सहभागी असून 3/4 उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.
खरच एक सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि त्याची जाणीव होते हेच मोलाचे सहकार्य लाभले. जिवनाला एक दिशा मिळाली.
धन्यवाद "टिम उत्कर्ष "
 हे कार्य जोरात चालु राहो अशी मी देवाचरणी प्रर्थना करतो
 हीच खरी ई श्व र seva...!!!
Similar Posts
दाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू आपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही घटकांना एकमेकांबद्दल नेमकी माहिती नसते. दात्यांना गरजूंपर्यंत आणि गरजूंना दात्यांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवणारा ई-सेतू ‘डोनेट एड सोसायटी’ या संस्थेच्या वेबसाइटच्या माध्यमातून नितीन घोडके या तरुणाने बांधला
दिव्यांगांच्या प्रगतीसाठी झटणारी ‘इडार्च’ संस्था ज्यांना हात नसतात, त्यांचेही भवितव्य चांगले असू शकते... ज्यांना पाय नसतात, तेही स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात... ज्यांना डोळे नसतात, तेही डोळस व्यक्तींप्रमाणे कामे करू शकतात... या गोष्टी सत्यात उतरविल्या आहेत पुण्यातील ‘इडार्च’ या संस्थेने. दिव्यांगांना शिकवण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे शिवधनुष्य या संस्थेने पेलले आहे
स्त्री-प्रबोधनासाठी झटणारी संस्था स्त्रियांच्या विविध प्रश्नांचं अध्ययन करून त्याद्वारे काढलेल्या अनुमानाद्वारे आणि त्या प्रश्नांवर शोधलेल्या उपायांद्वारे स्त्रियांमध्ये प्रबोधन घडवून आणण्याचं महत्त्वाचं काम करणारी पुण्यातली संस्था म्हणजे ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र.’ ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज पाहू या ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न
पर्यावरणप्रेम जागवणारी ‘निसर्गवेध’ ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे चटके बसलेल्या मानवजातीला आता निसर्गाची महती कळून चुकली आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी, त्याचे संवर्धन करण्यासाठी जगभरात विविध प्रयत्न केले जात आहेत. हे निसर्गभान सर्वसामान्य जनतेत जागविण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती जीव तोडून काम करत आहेत. अशीच पुण्यातील एक संस्था म्हणजे निसर्गवेध

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language